लठ्ठ खासदारांनी आरोग्य तपासणी करावी : केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा   

नवी दिल्ली : संसदेतील सर्व खासदारांनी वर्षातून किमान एकदा, तरी आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी केले. संसदेतील बहुतांश सदस्यांना लठ्ठपणाची समस्या असून, त्यांनी आरोग्याची काळजी घेणे आवाश्यक आहे. लोकसभेत आरोग्याशी निगडीत पूरक प्रश्नांचे उत्तर देताना आरोग्य मंत्री बोलत होते.
 
आम्हाला सर्व खासदारांच्या आरोग्याची काळजी आहे. तुमची आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य मंत्रालय सदैव तत्पर आहे. त्यामुळे सर्व सदस्यांनी वर्षातून एखादी तरी आरोग्य तपासणी करून घेण्याची विनंती आरोग्य मंत्र्यांनी केली. एवढेच नाही, तर खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील आरोग्यविषयी समस्या लवकर ओळखण्यासाठी प्रत्येक वर्षी आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांची संपूर्ण आरोग्य तपासणी करावी. जनतेच्या आरोग्याची तपासणी करणे तर गरजेचे आहेच. सभागृहात बसलेल्या सदस्यांनी स्वत:च्या आरोग्याची तपासणी करणेदेखील आवश्यक असल्याचे नड्डा म्हणाले. 
 
लोकसभा सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातील जनतेची आरोग्य तपासणी करण्याचे सांगा, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सूचवल्यानंतर नड्डा यांनी संबंधित वक्तव्य केले.देशभरातील ६३ कोटींहून अधिक नागरिकांना आयुष्मान योजनेंतर्गत मोफत उपचाराची सुविधा मिळत असल्याचे आणखी एका पूरक प्रश्नाचे उत्तर देताना आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले.

३५ कोटी लोकांची आरोग्य तपासणी

कर्करोग व क्षयरोगासह विविध आजारांची तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे देशभर आयुष्यमान आरोग्य मंदिर अभियान राबवण्यात येत आहे. त्याद्वारे ३० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे.या अभियानात उच्च कर्करोगासोबत रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांची तपासणी केली जात आहे. अभियानाला प्रतिसाद देत देशभरातील ३५ कोटी लोकांनी तपासणी केली आहे. 
 
४.२ कोटी लोकांना रक्तदाब, २.६ कोटी नागरिकांना मधुमेहाची समस्या आहे. २९.३५ कोटी लोकांची तोंडाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात आली. यापैकी १.१८ कोटी लोकांना कर्करोगाचे निदान झाल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. सभागृह सदस्यांनी स्वत:च्या आरोग्याची तपासणी करणेदेखील आवश्यक आहे.
 

Related Articles